Media

द ग्रेट रेझिग्नेशन

‘द ग्रेट रेझिग्नेशन’ अर्थात नोकरीचा राजीनामा, करोनाकाळात जगभरात पसरलेले हे लोण भारतात येणेही अपरिहार्यच. यात आस्थापनांनी द्यायला लावलेले आणि कर्मचाऱ्यांनी स्वत:हून दिलेले राजीनामे असा दोहोंचा समावेश असला तरी त्याचा मोठा फटका स्त्रीवर्गाला बसला आहे. भारतभरातील अनेक स्त्रियांनी या काळात राजीनामे दिले. काय आहेत त्यामागची कारणे आणि दुसऱ्या कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात स्त्रियांसाठी, याचा मागोवा घेणारा लेख.

नीलिमा, वय ३८. प्रॉडक्ट डिझाइन इंजिनीअर. घरात १३ वर्षांची मुलगी, ७ वर्षांचा मुलगा आणि खासगी नोकरीत असणारा नवरा असे कुटुंब. नीलिमाच्या आणि नवऱ्याच्या नोकरीमुळे, त्या पगारात घराचे हप्ते, मुलांचे शिक्षण वगैरे असे सगळे ठीकठाक चाललेले होते. अगदी करोना टाळेबंदीच्या काळातदेखील नीलिमाने पूर्ण प्रयत्नाने घरूनच, पण सगळे व्यवस्थित चालू ठेवले होते. कामाचा ताण होत होता, पण नोकरी तर करावीच लागणार होती. पर्याय नव्हताच. टाळेबंदीच्या आधीपासूनच इंटिरियर डिझाइनमधला एखादा अभ्यासक्रम पूर्ण करावा,असे नीलिमाच्या मनात होते. दोन वर्षांपूर्वी तिने स्वत:च्या घराचे इंटिरियर डिझाइन केले होते. इंटिरियर डिझाइनर खूप जास्त पैसे घेतात म्हणून तिने हट्टाने स्वत:च्या घराचे काम स्वत:च केले होते, पण ते सगळय़ांना एवढे आवडले, की तिच्या कामाची मागणी वाढली. आपल्यालाही हे काम आवडतेय हे तिच्या लक्षात आले होतेच. म्हणून तिने खूप मेहनतीने सहा महिन्यांचा इंटिरियर डिझाइिनगचा ऑनलाइन कोर्स पूर्ण केला. त्यानंतर दोन मैत्रिणींच्या सांगण्यावरून त्यांच्या घराचे इंटिरियर डिझाइन करून दिले होते. न मागूनही मैत्रिणींनी त्याचा चांगला मोबदलादेखील दिला. हळूहळू नीलिमाच्या लक्षात येत गेले, की आपण आतापर्यंत ज्या कंपनीमध्ये  नोकरी करत होतो तिथे आपल्याला आपल्या कामाचा पुरेसा मोबदला मिळत नाही आणि काम करण्याचे समाधानदेखील मिळत नाही. इंटिरियर डिझाइनचे काम आपण जास्त चांगले करू शकतो, हा आत्मविश्वास तिला आला. कामेही येऊ लागली आणि तिने नोकरीचा राजीनामा दिला. नवीन कामात ती आता उत्तम रुळली आहे.

नीलिमाचे उदाहरण तसे प्रातिनिधिक. टाळेबंदीच्या एवढय़ा फेऱ्यांनंतर खरे तर भारतीय स्त्रियांची कार्यालयीन काम करण्याची, व्यवसाय सांभाळण्याची पद्धत आमूलाग्र बदलली आहे. या बदलातून जात असतानाच त्या सामोऱ्या जात आहेत ‘द ग्रेट रेझिग्नेशन’ला. ‘द ग्रेट रेझिग्नेशन’ हा प्रकार खरे तर सुरू झाला प्रामुख्याने प्रगत देशांमध्ये. अमेरिकेत २०२१ च्या सुरुवातीला स्वत:हून नोकऱ्या सोडून जाण्याचे नोकरदारांचे प्रमाण अचानक खूप मोठय़ा प्रमाणात वाढल्याचे लक्षात आले. हळूहळू हे लोण जगभर पसरले. भारतातदेखील २०२१ च्या मध्यापर्यंत ‘द ग्रेट रेझिग्नेशन’ने शिरकाव केला. काही ठिकाणी कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा पर्याय स्वीकारला होता तर काही ठिकाणी कर्मचाऱ्यांनी स्वत:हून वेगवेगळय़ा कारणांसाठी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला होता. ते प्रमाण इतके होते की सप्टेंबर २०२१ पर्यंत, माहिती आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी नोकरीसाठी दीड लाखाच्या वर नवीन कर्मचाऱ्यांची मागणी केली होती. ‘प्राइझ वॉटरहाऊज कूपर्स’ (PWC) संस्थेच्या सर्वेक्षणानुसार जगभरात १० मधील ९ कर्मचाऱ्यांच्या मते त्यांची कंपनी सोडून जाणाऱ्या लोकांचे प्रमाण आधीपेक्षा बरेच वाढलेले आहे. ‘अ‍ॅमेझॉन इंडिया’ने सप्टेंबर २०२१ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार नोकरीच्या शोधात असलेल्या प्रौढांपैकी ५१ टक्के लोकांनी याआधी कधी न केलेले, अजिबात अनुभव नसलेले काम स्वीकारले तर ६८ टक्के लोकांनी कामाचे क्षेत्रच बदलले.

भारतीय स्त्रियादेखील या ‘ग्रेट रेझिग्नेशन’ मधून बाजूला राहिल्या, असे म्हणता येणार नाही. आपले काम करण्याचे मूळ क्षेत्र बदलून, चांगला पगार स्वीकारून, काही वेळा कमी पगार स्वीकारून या स्त्रिया आहे ती नोकरी सोडून दुसरी नोकरी स्वीकारत आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर, विक्रेते आणि उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांमध्ये बऱ्याच वेळा लवचीक कार्यपद्धतीचा अवलंब झाला नाही, किंवा घरून काम करण्याची सुविधा मिळू शकली नाही, तिथे स्त्रियांनी राजीनामा देण्याचे प्रमाण सगळय़ात जास्त आहे. कधी त्या दुसऱ्या नोकऱ्यांकडे वळताना दिसत आहेत तर कधी व्यवसायाकडे.

या सगळय़ांची प्रामुख्याने जी कारणे दिसतात ती पुढीलप्रमाणे –

२०२१ चा ‘लिंक्डइन अपॉच्र्युनिटी इंडेक्स’ (linkedin opportunity index) नुसार संघटित क्षेत्रातील जवळपास ४० टक्के स्त्रियांना टाळेबंदीच्या काळात कामाचा दुप्पट ताण सहन करावा लागला. संघटित क्षेत्रात काम करणारी असो वा असंघटित क्षेत्रातील, भारतीय स्त्री अजूनही घर आणि कार्यालय यांच्यातील दोरीवरचे खेळ खेळतेच आहे. २०२० आणि २०२१ च्या टाळेबंदीच्या दरम्यान कार्यालयीन आणि घरचे काम करून स्त्रियांचा जीव मेटाकुटीला आला होता. मुळातच घराचे कुंपण ओलांडून स्वत:चे आर्थिक नशीब जमावणे हे भारतीय स्त्रीसाठी अवघड होतेच, त्यात करोनाकाळात वाढलेल्या कामानेही अडचण आणखीनच मोठी केली.

करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर बऱ्याच आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना कार्यालयात रुजू व्हायला सांगितले. काही  कार्यालयांनी घरून काम करण्याचा पर्याय खूप लवकर थांबवला. पण टाळेबंदीमुळे बऱ्याच स्त्रियांकडे मुलांची देखभाल करण्यासाठी दुसरा कुठलाही पर्यायही उपलब्ध नव्हता. साहजिकच पूर्ण वेळ कार्यालयात येऊन काम करणे त्यांच्यासाठी मोठेच आव्हान होते. लहान मुले असलेल्या घरात आधीसारखा पाळणाघरांचा पर्याय अजूनही उपलब्ध नव्हता. मुलांची शाळा, महाविद्यालये सुरू झालेली नव्हती. भारतीय समाजपद्धतीत आजही मुलांची काळजी घेणे हा प्रामुख्याने आईच्या कर्तव्याचा भाग आहे. त्यामुळे नोकरीचा राजीनामा देण्यावाचून अनेक स्त्रियांकडे पर्याय राहिला नाही.  करोना आजाराची भीती हेदेखील यामागचे महत्त्वाचे कारण आहे. कार्यालयात जाऊन आपल्याला लागण होण्याची शक्यता, शिवाय मुलांना पाळणाघरात ठेवून तिथे लागण होण्याचा धोका बऱ्याच स्त्रिया पत्करायला तयार नाहीत, या कारणाने स्त्रिया आहे त्या नोकरीचा राजीनामा देऊन कमी पगाराची नोकरी स्वीकारताना आढळत आहेत.

करोना सुरू झाल्यानंतरही पुरुषांचा घरकामातला सहभाग वाढला असला तरी अगदी मोजका आणि मोजक्या ठिकाणी होता. लिंग अंतर निर्देशांक (gender gap index) मध्ये भारत २०२१ मध्ये १५६ देशांपैकी १४० व्या क्रमांकावर होता. घरातल्या वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे कार्यालयातील जबाबदारीची पदे निभावणे, तिथला ताण सहन करणे हे स्त्रियांना नको वाटते आहे. ताणविरहित जगता यावे असे वाटण्याकडे कल वाढत चाललेला दिसतो आहे. कमी पगार, वरिष्ठांचा कामासाठीचा तगादा, पूर्ण न करता येणारे लक्ष्य अशा बऱ्याच गोष्टींमुळे ‘नोकरीचा राजीनामा’ हा पर्याय बऱ्याच जणींनी निवडलेला आहे.  करोनाकाळात स्त्रियांचा स्वत:कडे बघण्याचा दृष्टिकोन काही अंशी बदललेला दिसतो. स्वत:ची, कुटुंबीयांची तब्येत हा एक महत्त्वाचा भाग त्यांच्या दैनंदिनीमध्ये आला आहे. शिवाय बऱ्याच स्त्रियांना छंद जोपासण्यासाठी मोकळा वेळ हवा आहे. भरभरून आयुष्य जगण्याची गरज त्यांना वाटू लागलेली आहे. पूर्ण वेळ नोकरी करून या गोष्टी करता येणे शक्य नसल्याने नोकरी सोडून अर्धवेळ काम करणे, किंवा अन्य काम करण्याचा पर्याय त्या स्वीकारत आहेत.

या काळात आपल्याला मिळणारा पगार आणि आपण कामासाठी दिलेला वेळ यांचे प्रमाण व्यस्त आहे, याची जाणीव बऱ्याच स्त्रियांना होताना दिसते आहे. करिअरच्या उत्तम संधी, आवडीचे काम यासाठी आधीची नोकरी सोडण्याचे त्या ठरवत आहेत.फक्त प्रगत देशांतच नाही तर भारतासारख्या विकसनशील देशातही उद्भवलेली ‘ग्रेट रेझिग्नेशन’ची ही समस्या साहजिकच देशाच्या आर्थिक, सामाजिक बाबींवर परिणाम करणारी ठरणार आहे.  ‘आंतरराष्ट्रीय कामगार संघटने’च्या मते नोकरी सोडून जाणाऱ्या बऱ्याच स्त्रिया पुन्हा कधीही नोकरीवर परत न येण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. पुरुष कर्मचाऱ्यांनी स्वयंचलित रोजगाराचा (सेल्फ एम्पलॉयमेंट) पर्याय निवडला, तसादेखील बऱ्याचशा स्त्रिया निवडताना दिसत नाहीत. भारतात स्त्रियांची संख्या जवळपास ५० टक्के आहे. भारतीय पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे कमी असलेले उत्पन्न आता आणखीनच खाली जाण्याची शक्यता आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीने ही बाब काळजी करायला लावणारी आहे. सुनियोजित वा संघिटत क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांचे हे हाल तर असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत आर्थिक दरी अधिक वाढण्याचा धोका खूपच जास्त संभवतो.

घरून काम करण्याच्या पर्यायांमध्ये बऱ्याच स्त्रियांनी अर्धवेळ किंवा कमी वेळ काम करण्याचा पर्याय निवडला. या पर्यायामुळे त्यांना उपलब्ध असलेल्या कामाच्या संधी कमी असणार आहेत. शिवाय त्यात त्यांना मिळणारे मानधनदेखील कमी असणार आहे. घराची आर्थिक घडी यामुळे विस्कळीत होण्याची शक्यता आहे. इतिहासातील कुठल्याही मोठय़ा संकटाच्या वेळी त्याचा सगळय़ात मोठा आर्थिक परिणाम स्त्रीवर्गाला सोसावा लागला आहे. तसाच तो या ‘ग्रेट रेझिग्नेशन’चापण सोसावा लागेल असे वाटते.  भारतात उपलब्ध असलेल्या कर्मचारीवर्गात ६८ टक्के पुरुष तर जवळपास ३२ टक्के  स्त्रिया आहेत. पुन्हा एकदा आर्थिक स्वावलंबन कमी झाले, स्त्री-पुरुष दरी आहे त्यापेक्षाही मोठी झाली तर त्याचा परिणाम फक्त अर्थकारणापुरता मर्यादित न राहता स्त्रियांच्या मानसिकेतेवरही व्हायला सुरुवात होईल. काम करण्याचे क्षेत्र हे स्वतंत्र असल्याने, घराबाहेर पडल्यावर बऱ्याच स्त्रिया शांत आणि आनंदी असायच्या. आता जर घर आणि काम यांची सरमिसळ झाली, आणि आर्थिक स्वावलंबन हरवले तर मानसिक आजार वाढीस लागण्याची शक्यता आहे.

संस्था/कार्यालयाची भूमिका –

भारतामध्ये ‘ग्रेट रेझिग्नेशन’ने शिरकाव केलेला असताना त्यात कर्मचाऱ्यांसाठी आस्थापनांनी कुठले उपाय केले आहेत किंवा करायला हवेत हे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषत: स्त्रियांच्या बाबतीत कार्यालयाने खूप डोळस आणि प्राथमिकता देणारी भूमिका घ्यायला हवी. दुर्दैवाने भारतीय कार्यालयात स्त्री रोजगाराबद्दलची जागरूकता हा सर्वात शेवटचा मुद्दा आहे. स्त्रिया नोकरी सोडून का जात आहेत याचा अभ्यास संस्थांनी करायला हवा. त्यावर अर्थपूर्ण चर्चा व्हायला हवी. सोडून जाणारी कामासाठीची ‘मानवी शक्ती’ कशी थांबवता येईल यावर मंथन व्हायला हवे. मुळातच अत्यल्प प्रमाणात रोजगारात असलेल्या स्त्री कर्मचाऱ्यांपैकी आणखी काही सोडून गेल्या तर उरलेल्या मनुष्यबळावरच काम करावे लागेल. जे संस्था आणि देश या दोन्हीच्या विकासाचे द्योतक नाही. व्यवस्थापक, वरिष्ठ कर्मचारी यांना आपल्या स्त्री कर्मचाऱ्यांना समजावून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आपण कुठल्या पद्धतीने नेतृत्व करतो आहोत याची फेरतपासणी करण्याची वेळ आहे.

संस्थेतून बाहेर पडणाऱ्या स्त्रियांची मुलाखत घेऊन सोडून जाण्यामागची कारणे व्यवस्थापकांनी शोधून काढायला हवीत. कुठल्या मानसिकतेमध्ये   स्त्री बाहेर पडते आहे. ती निराश आहे का? तिच्या मानसिक स्थितीसाठी कामाच्या ठिकाणच्या काही गोष्टी कारणीभूत आहेत का? तिच्या कामात बदल केले तर तिची मानसिकता बदलू शकते का, तिचा सोडून जाण्याचा निर्णय ती बदलू शकते का, या प्रश्नांसाठी वेळ द्यायला हवा.  संस्थेने जर काम करण्याच्या वेळेत काही बदल केले, या वेळा लवचीक केल्या तर बऱ्याच अंशी ही समस्या दूर होऊ शकते. भारतातील बऱ्याच संस्थांनी याआधीच यातील बरेच पर्याय कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिले आहेत. जसे , पूर्ण वेळ घरून काम करणे, अर्धवेळ काम करणे, आठवडय़ातील काही दिवस कार्यालयात येऊन आणि काही दिवस घरून काम करणे. वगैरे. आपापल्या संस्थेनुसार कामाच्या वेळेचे धोरण वारंवार तपासून घ्यायला हवे.

बऱ्याच प्रमाणात वरिष्ठ व्यवस्थापक यात एका कुटुंबप्रमुखाची भूमिका बजावू शकतात. काम करणाऱ्या स्त्रियांची मानसिकता लक्षात घेऊन त्यांच्या अडचणी वेळोवेळी विचारायला हव्यात. जी समस्या समजलीच नाही त्यावर पर्याय काढता येणं अवघड आहे, त्यामुळे समस्या समजावून घेणे आवश्यक आहे. योग्य व्यक्तीला योग्य काम मिळाले आहे का, प्रत्येकाच्या कौशल्याप्रमाणे कामाची विभागणी झाली आहे का हेदेखील समजावून घ्यायला हवे.  वारंवार बोलली गेलेली तरी अजूनही कित्येक कार्यालयीन ठिकाणी उपलब्ध नसलेली सुविधा म्हणजे स्त्री कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी पाळणाघरे. करोनानंतर नोकरी सोडण्याचे सगळय़ात मोठे कारण म्हणजे मुलांबाबत वाटणारी असुरक्षितता. ती असुरक्षितता जर संस्था दूर करू शकल्या तर उद्भलेल्या परिस्थितीत काही अंशी बदल दिसेल. मुलांसाठी खेळायच्या जागा, झोपण्याच्या जागा, लहान मुलांसाठी पाळणाघरे हे संस्थेच्या आवारात उभारायला हवेत.   आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे ‘ग्रेट रेझिग्नेशन’ हे फक्त चांगला पगार हवा म्हणून दिलेला राजीनामा नाही. त्याव्यतिरिक्त बरीचशी कारणे त्यामागे आहेत. स्त्री कर्मचाऱ्यांना काम करण्याचे समाधान मिळते आहे का, त्यांना कामाच्या ठिकाणी काही बदल हवेत का? त्यांच्या कौशल्यविकासाच्या कार्यक्रमावर जर भर देता आला तर अजूनही काही वेगळय़ा गोष्टी समोर येतील असा विश्वास वाटतो. व्यवस्थापकांना कर्मचाऱ्यांचे कोच, मेंटॉर म्हणून काम करावे लागेल. मानव संसाधन विभागाची सगळय़ात जास्त गरज आता येणाऱ्या काळात भासणार आहे. स्त्री कर्मचाऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी ज्या ज्या संस्था वेळ, शक्ती आणि पैसा खर्च करतील, त्यांना ‘ग्रेट रेझिग्नेशन’च्या समस्येला कमी तोंड द्यावे लागेल हे नक्की. सर्वसामान्य कर्मचारी स्त्रीवर्गानेसुद्धा ‘ग्रेट रेझिग्नेशन’ ही अडचण म्हणून न बघता आपल्याला विकसित करायला मिळालेली संधी म्हणून याकडे बघितले तर काही अंशी आपल्यादेखील समस्या कमी होतील. वैयक्तिक पातळीवर करता येण्याजोगे प्रयत्न –  स्वत:कडे तटस्थ दृष्टीने बघून, स्वत:चे परखड परीक्षण करून कुठल्या प्रकारच्या कौशल्यविकासाची आपल्या नोकरीसाठी गरज आहे ते शोधून काढणे. स्वत:ला या कौशल्यांच्या बाबतीत अद्ययावत ठेवणे. आपण करत असलेल्या कामाव्यतिरिक्त आणखी कोणती कामे आपण करू शकतो हे शोधून त्यातील कौशल्य विकसित करणे. जेणेकरून नोकरी गमवावी लागली तरी दुसऱ्या नोकरीसाठी आपण तयार असू.

फक्त कौशल्याचा विकास करून भागणार नाही तर वेगवेगळय़ा पद्धतीने सोशल नेटवर्क या स्त्रियांना विकसित करावे लागेल. आपण कुठले नवीन काम शिकलो, कौशल्य शिकलो तर ते अशा व्यावसायिक सोशल मीडिया साइटवर अद्ययावत करायला हवे. आपले काम लोकांना माहिती व्हायला हवे. आपल्या व्यावसायिक क्षेत्रातील लोकसंपर्क जपणे ही आताच्या काळाची गरज झालेली आहे. नोकरी गमावली तरीही निराश न होता, जितके स्त्री आणि पुरुष नोकरी सोडून गेलेले आहेत त्या जागा आपल्यासाठी रिकाम्या झाल्या असे समजूया. बाजारात आपल्यासाठी तितक्या संधी उपलब्ध झाल्या. आपल्या मनाप्रमाणे काम करण्याची संधी साधली तर ही परिस्थिती ‘ग्रेट रेझिग्नेशन’ न राहता ‘ग्रेट इन्व्हिटेशन’ नक्की होईल.

(लेखिका ‘एक्स्पोनेन्शिया लर्निग सोल्युशन्स प्रा. लि.’ या मनुष्यबळ विकास कंपनीच्या संचालिका आहेत.)

Sarika@exponentialearning.in 

article-1
exponentia-media-img-1
great-resignations